बैलजोडी जप्त करतो; शेतकऱ्याला धमकी देत अधिकाऱ्यांनी घेतली 200 रुपयांची लाच, Video व्हायरल

बैलजोडी जप्त करतो, अशी धमकी देत बँकेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांकडून दोनशे रुपयांची लाच घेतल्याचा प्रकरण उघडकील आले आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील ही घटना आहे. शेतकरी दरवर्षी शेतीसाठी खासगी बँकांकडून कर्ज काढतात. शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जाची परतफेडही केली जाते. शेतकरी आता पुढील हंगामाच्या तयारी लागला आहे. असाच एक वयोवृद्ध शेतकरी टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असताना अर्बन बँकेच्या वसुली पथकाने त्यांना अडवले आणि पैसे देण्याची मागणी केली. त्याचबरोबर शेतकऱ्याला बैलजोडी जप्तीची धमकी देऊ लागले. शेवटी तडजोड करीत शेतकऱ्याने 200 रुपयांची नोट त्या कर्मचाऱ्याच्या हातात दिल्यानंतर तो माघारी गेला. कर्ज वसुलीच्या नावावर बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांशी कसे वागतात, याचा हा नमुना आहे. आता हे प्रकरण काँग्रेस नेते आणि ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उचलले. त्यांनी पोलीस अधिक्षकांशी बोलून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. परंतु राज्यात अशी कितीतरी प्रकरणे घडत असतील, जी शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. ऐन हंगामात शेतकऱ्यांशी असा व्यवहार होत असेल, तर आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. याच जाचातून सुटका करण्यासाठी आजवर हजारो शेतकऱ्यांनी गळ्याभोवती फास आवळला असेल. सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या कितीही बाता करीत असले तरी व्यवस्था किती निष्ठूर आहे, हे यातून दिसून येते.