चंद्रपूरसह राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि वर्षभर झोपलेल्या चंद्रपूर महानगपालिकेला अचानक जाग आली. एकिकडे घरांमध्ये पाणी शिरू नये म्हणून सामान्य नागरिक घराची डागडूजी करण्यास प्राधान्य देत आहे. तर, दुसरिकडे महानगरापालिका सुडबुद्दीने काही कुटुंबांच्या घरांवर बुलडोजर फिरवला. त्यामुळे अनेक कुटुंब ऐन पावसाळ्यात बेघर झाली आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेने अतिक्रमनाच्या नावाखाली शहरातील चांदा रय्यतवारी, शास्त्रकोर लेआउट परिसरातील घरांवर बुलडोझर फिरवला आहे. मागील पाच वर्षांपासून ज्या घरात संसार केला ते घर आज डोळ्यादेखत भुईसपाट झाल आहे. शास्त्रकार लेआउट परिसरात राहणाऱ्या अशोक सोनाजी इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तीन लाख सत्तर हजार रुपायांमध्ये सदर जागा खरेदी केली होती. या जागेवर त्यांनी घर बांधल आणि ते नियमीत महानगरपालिकेला टॅक्स भरत होते. असे असताना महानगरपालिकेने त्यांना अतिक्रमणाची नोटीस पाठवली. नोटीसेला अशोक यांनी प्रतिउत्तर देत आम्ही ही जागा खरेदी केली असल्याचे सांगितले. मात्र तरीही आज त्यांच्या घरावर महानगरपालिकेने बुलडोझर फिरवला. त्यामुळे त्यांच्या घरातील वस्तुंच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घर गेल्याने आता रहायचं कुठे हा मोठा प्रश्न त्यांच्या सहित वस्तीतील लोकांपुढे निर्माण झाला आहे. संतप्त झालेल्या अशोक इंगळे यांनी गरजेच्या वस्तू सोबत घेत कुटुंबासहित महानगरपालिकेच्या आवारात संसार थाटला आहे. सदर घटनेबाबत स्थानिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच ऐन पावसाळ्यात अतिक्रमण मोहिमेच्या नावावर गरिब कुटुंबांच्या घरावर बुलडोझर चालविणे गरजेचे होते काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.