Chandrapur News – आयुक्तांच्या वाहनावर उधळले पैसे! महापालिकेसमोर आंदोलन करत माजी नगरसेवकाचा संताप

चंद्रपूर शहरात धुळ, खड्डे अनावश्यक खोदकाम आणि महानगरपालिकेतील घोटाळ्याविरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमूख यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या गाडीवर पैसे उधळत निषेध केला. यावेळी महास्वाक्षरी अभियान घेत सह्यांचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे.

चंद्रपूर शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही. शिवाय धुळीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी निधी आणि इतरही योजनांसाठी पैसा नसताना खोदकाम करून नागरिकांच्या जीवाशी खेळ कशासाठी? असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केलाय. घोटाळे करण्यासाठी पैसे आहेत, पण रस्त्याची डागडुजी करण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत. केवळ पैसे खाण्याचे काम मनपात सुरू असल्याचा आरोप करत पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या वाहनावर पैसे उधळत अनोखे आंदोलन केले.

चंद्रपूर शहरात खड्ड्यांनी प्रदूषण वाढविले, मार्च महिना ठरला सर्वाधिक प्रदूषित

केवळ कमिशनच्या लालसेपोटी आणि मर्जीतल्या कंत्राटदाराला काम मिळवून देण्यासाठी महापालिकेअंतर्गत नको ती कामं केली जात आहेत. १०० कोटींची भूमिगत गटार योजना १५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती. ती आता खड्ड्यात गेली. आता ५०६ कोटींची नवीन भूमिगत गटार योजना करत आहेत. अमृत पाणीपुरवठा योजनेत २३४ कोटी खर्च झाले. पण पाणी नाही मिळालं. पुन्हा २७० कोटींची नवी योजना आणली. २० वर्षांपासून रस्ते बनवणे, रस्ते खोदने… यामुळे शहरातील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या. प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरीही मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींचं पोट भरत नाही. आणि म्हणून प्रतिकात्मक स्वरुपात आम्ही महापालिकेसमोर आयुक्तांच्या वाहनावर पैशांची उधळण केली, असे माजी नगरसेवक पप्पू देशमुख म्हणाले.

मंत्रीपद न मिळालेल्या भाजप नेत्यांची नाराजी कायम; मुनगंटीवारांनी मनातली खदखद पुन्हा बोलून दाखवली