
चंद्रपुरातील तापमान 45 अंशाच्या पुढे गेले आहे. या वाढलेल्या तापमानामुळे विहिरींनी तळ गाठल आहे. जिल्ह्यातील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराचा पाणीपुरवठा इरई धरण आणि इरई नदी या दोन स्त्रोतांमधून होतो. मात्र अमृत पाणीपुरवठा योजनेचा दुसरा टप्पा संथ गतीने राबविला जात असल्याने शहराच्या निम्म्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.मनपाच्या आठ व खासगी चार अशा बारा टँकरच्या माध्यमातून पाणीटंचाई असलेल्या वडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यासह अन्य भागातील परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अनेक वार्डांमध्ये 180 टँकर फेऱ्याद्वारे तहान भागविली जात आहे. शहराच्या एकूण 90 ठिकाणी तात्पुरत्या पाणी टाक्या उभारून नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. अश्यात चंद्रपूरातील भीषण पाणीटंचाई दर्शविणारा एक विडिओ पुढे आला आहे. तहान भागवणाऱ्या विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी सोडल्यात जात आहे. पाणीटंचाईची भीषणता दर्शवणारा हा व्हिडिओ सध्या वायरलं झाला आहे. हा विडिओ चंद्रपूर शहरातील घुटकाला परिसरातील आहे.