गणेश विसर्जन पाहण्यासाठी आलेले एका तरुणाने आपल्याहून वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकून सिगारेट पेटवली अन् राडा झाला. आधी बाचाबाची झाली आणि नंतर गुद्द्यापर्यंत आले. त्यानंतर चाकूनेही वार करण्यात आले. यावेळी झालेल्या गोंधळादरम्यान पोलिसांच्या गाड्याही फोडण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गुजरी या गावात ही घटना घडली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या गावामध्ये तणावपूर्व शांतता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरी गावात इरफान शेख नावाचा व्यक्ती अवैध दारू विक्री करतो. या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सकमूर येथे गणेश मूर्तींचे विसर्जन होते. इरफान आणि त्याचे नातेवाईकही मिरवणूक पाहण्यासाठ गेले होते. यावेळी इरफान शेख याच्या सकमूर गावातील नातेवाईकाने एका व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकून सिगारेट पेटवली आणि धूर सोडू लागला. सदर व्यक्तीने त्याला हटकल्याने वादाचा भडका उडाला.
इरफान आणि त्याच्या नातेवाईकांना किरण एनगंटीवार यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या पोलीस पाटील तुळशीराम काळे, मोहन तांगडे, विभाकर शेराखे यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच शेकडोंचा जमाव जमा झाला आणि दोन आरोपींना पकडून त्यांना बेदम चोप देण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनात ठेवले. यावेळी मुख्य आरोपी इरफानला अटक करा आणि अटक केलेल्यांना आमच्या हवाली करा अशी मागणी गावकऱ्यांनी रेटून धरली. परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली. यावेळी पोलिसाच्या वाहनाखाली विजय खर्डीवार यांचा पाय आल्याने ते जखमी झाले आणि वातावरण चिघळले.
जमावाने पोलिसांच्या वाहनाच्या चाकातील हवा सोडली, काचा फोडल्या. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळ गाठावे लागले. त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढल्याने वातावरण शांत झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना अटक केली असून मुख्य आरोपी इरफानचा शोध सुरू आहे.