
चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती इथे असलेल्या अरविंदो कोळसा खाण व्यवस्थापनाने मनमानी चालवल्याचा आरोप करत जवळपासच्या गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. अरविंदो कोळसा खाण ही एक खासगी कंपनीची आहे. भद्रावती तालुक्यातील किलोनी गावाजवळ ही खाण आहे. या खाणीतून कोळशाचे उत्पादन सुरू झाले आहे. खाण सुरू होताच व्यवस्थापनाने मनमानी सुरू केल्याचा आरोप किलोनीवासियांनी केला आहे.
किलोनी गावाला जोडणारा जिल्हा परिषदेचा डांबरी मार्ग या कंपनीने पूर्णपणे नष्ट केला आहे आणि तो भाग खाणीत घेतला आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा पक्का मार्ग तोडण्यात आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना रस्ताच उरला नाही. गावकऱ्यांना शांत करण्यासाठी या कंपनीने दुसरा मार्ग बांधून दिला असला तरी जुना मार्ग कोणत्या अधिकाराने तोडला, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही. शासकीय मार्ग तोडण्याची हिंमत एखादी खासगी कंपनी कशी करू शकते, असा सवाल आंदोलकांनी केला आहे. यासाठी खाणीच्या जवळच गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही खाण धोकादायक झाली आहे. सुरक्षेचे मानक पाळण्यात न आल्याने खाण सुरक्षा संचालकांनी नोटीससुद्धा बजावली. त्यालाही न जुमानता ही खाण सुरू आहे. त्यामुळे प्रशासन या कंपनीच्या दावणीला कसे बांधले गेले, हेच दिसून येते, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान, खाण व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी नियमानुसार आम्ही काम करीत असल्याची प्रतिक्रिया फोनवरून गावकऱ्यांना दिली.