चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र घटले, नव्या सर्वेक्षणात धक्कादायक वास्तव आले समोर

वन विभागाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र दोन टक्क्यांनी कमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वन सर्वेक्षण विभागाने 2023 ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली. त्यात देशात एकूण भूभागाच्या 25.17 टक्के क्षेत्रात जंगल आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण 16.94 टक्के आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यात 35.21 टक्के वनक्षेत्र असल्याचे म्हटले आहे.

2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 35.40 टक्के जंगल होते, तर 2023 च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण 35.21 टक्क्यांवर आले आहे.

* 2021 मध्ये घनदाट जंगल 1320.89 वर्ग किमी होते. 2023 मध्ये ते कमी होऊन 1318.87 वर्ग किमी झाले.

* 2021 मध्ये मध्यम घनदाट जंगल 1555.39 वर्ग किमी होते. ते घटून 2023 मध्ये 1521.60 वर्ग किमी झाले

* 2021 मध्ये उघडे वन क्षेत्र 1173.99 वर्ग किमी होते. ते वाढून 2023 मध्ये 1189.18 वर्ग किमी झाले

* झुडपी जंगलात मात्र अल्पशी वाढ झाली आहे. 2021 मध्ये 43.67 होते. हे प्रमाण वाढून 23 मध्ये 44.06 टक्के झाले.

देशात वन क्षेत्र वाढले असताना आणि चंद्रपूर वनांचा जिल्हा असतानाही चंद्रपूरचे वन क्षेत्र कमी कसे झाले, असा प्रश्न निर्माण झालाय. आधीच इथे वाघ-मानव संघर्ष वाढलेला असताना ,भ्रमण मार्ग तुटले असताना वन क्षेत्र कमी होणे, ही चिंतेची बाब ठरली आहे.