चंद्रपूर शहराच्या गौतमनगर भागात चार अल्पवयीन मुलांनी रात्रीच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. अंचलेश्वर परिसरात दुचाकीने जाताना दुचाकीचा कट लागून वाहनाचे नुकसान झाल्याचे कारण पुढे आले आहे. कट लागल्यावर तन्मय शेख या युवकाचा पाठलाग करत चौघांनी आधी त्याला धाक दाखवून नुकसान भरपाई मागितली. तन्मय शेखने यासाठी घराकडे सोबत यावे असे सांगत सर्वांना गौतमनगर परिसरात आणले. मात्र वाद वाढल्यानंतर चौघांनी मारहाण करत तन्मय शेख याची हत्या करत मृतदेह झुडुपात फेकला. नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना तन्मयने आपल्या भावाला घटनेची माहिती दिली होती. मोबाईल ट्रेस न झाल्याने भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरू झाला. तपासादरम्यान चार अल्पवयीन आरोपींची नावे पुढे आली आहेत. घटनेत क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसर हादरला आहे. यात एक आरोपी तर चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देखील आहे.