
कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवीत चंद्रपूर वन विकास महामंडळाने (fdcm ) वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वन मजूर अशा सहा कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. त्यामुळे वन विकास महामंडळ आणि वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील पांडुरंग आत्राम, वनपाल विपुल संभाजी आत्राम, उमेश प्रल्हाद डाखोरे,नेताजी मोहन बोराडे,वनरक्षक प्राची देवकुमार चुनारकर, वनमजूर किशोर हिरामण गेडाम अशी निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चंद्रपूर वन विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 412 मध्ये वृक्षतोड झाली. वृक्षतोड केलेला माल आरोपीकडून जप्त करण्यात आला. जप्त केलेला माल हा लिलाव करण्याची चर्चा आहे.
मात्र कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी याबाबत निश्चित कारण सांगण्यात आलेले नाही. तरी वन विकास महामंडळाने केलेली ही कार्यवाही जिल्हातील मोठी कार्यवाही ठरली आहे. या कार्यवाहीने वन विकास महामंडळ आणि वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास टाळले आहे.