
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला मात्र चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाच नाही. मात्र रविवारी संध्याकाळी पावसाने शहराला झोडापून काढलं आणि अवघ्या तासाभरात 100 मिमी पावसाची नोंद झाली. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील रस्ते जलमय झाले तर सखल वस्तीत पाणी शिरले.
पहिल्या एका तासातच 100 मिमी पाऊस पडला दोन तासात 119 मिमीची नोंद झाली. दरवर्षी अशा कमी वेळात अत्यधिक पावसाच्या घटनांत वाढ होत आहे. शहरीकरण,प्रदूषणण यामुळे तापमान वाढ झालेली आहे. परिणामी हवामानात मोठे बदल झालेत. ह्या अर्बन हिटमुळे पाऊस शहरात जास्त आणि ग्रामीण भागात कमी पडतो. हे प्रकार महाराष्ट्रात सर्व शहरात घडत आहेत, असे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
प्रसूतीकक्ष जलमय
चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती कक्ष जलमय झाल्याचे व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. व्हिडीओ बघून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.