पुणे महापालिकेच्या विभाजनसंदर्भात अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री हे करणार आहेत. आम्ही 15 जानेवारीला पुण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट मागितली आहे. 34 गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही आशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे. त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे, म्हणून दोन महानगरपालिका केल्या पाहिजेत आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला. यावेळी त्यांनी महामेट्रोचे प्रमुख श्रावण हर्डीकर यांचा सन्मान केला. त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोनची पाहणी केली. यावेळी आमदार हेमंत रासने, रवी साळेगावकर, प्रमोद कोंढरे, स्वरदा बापट हे उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पुण्यात सरासरी पावणे दोन लाख लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात. लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारतर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल.’
पुरंदर विमानतळाच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘पुरंदर विमानतळाच्या सर्व परवानग्या झाल्या असून, भूसंपादनाबाबत गती पकडावी लागणार आहे. याला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.’
पालकमंत्री पदासाठी समन्वय हा फार्म्युला
पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘या विषयात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय करतात. तसेच त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय करतील, तसेच आमच्या पालकमंत्री पदाबाबत कोणताही फॉर्म्युला नसून समन्वय हा आमचा फॉर्म्युला आहे.’