पाच लाख लाडक्या बहिणींना वगळलं यात आरडाओरड करण्याची गरज नाही; चंद्रकांत पाटील यांचे अजब विधान

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पाच लाख बहिणींना वगळले असले, तरी यात आरडाओरड करण्याची गरज नाही, असे अजब वक्तव्य भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. ‘गरज सरो, वैद्य मरो’ याप्रमाणे त्यांच्या विधानाची सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ टर्निंग पॉइंट ठरली. त्यावेळी कोणतेही निकष न पाहाता अर्ज केलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी पायघड्या घालणारे महायुतीचे सरकार आता मात्र निकषाचे कारण देत लाभापासून बाजूला करत आहे.

या संदर्भात आज शिवाजी विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमासाठी आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी महायुतीच्या सत्तेसाठी कारणीभूत असलेल्या लाडकी बहीण योजनेतून 5 लाख बहिणींना वगळल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ‘लाडकी बहीण योजनेचा 2 कोटी 42 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. मग ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणायचे की अर्धा भरलेला आहे असे म्हणायचे,’ असा सवाल करत, ‘आपल्यासाठी ग्लास अर्धा भरण्याचे असल्याचे सांगत, ज्यांच्याकडे कार आहे, इन्कम टॅक्स भरलेला आहे किंवा एका घरात अनेक महिलांनी लाभ घेतला आहे, अशा 5 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. यामध्ये इतका आरडाओरडा करण्याची गरज नाही’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय या महिलांच्या खात्यावर यापूर्वी जमा झालेले पैसे पुन्हा घेणार नाही की कसली कारवाई करणार नाही, याबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.