
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एक विशिष्ट दर्जा व वलय आहे. इतिहास आहे. मात्र कुस्तीमध्ये राजकारण घुसल्याने संघटनांच्या वादातून एका वर्षात चार वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ‘महाराष्ट्र केसरी’ चा हा खेळ कशासाठी? असा सवाल करत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ आणि शिवसेनेचे राज्य संघटक चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. राज्य शासनाने कुस्ती संघटनेतील राजकारण संपवावे अन्यथा आपण 5 मार्चपासून मंत्रालयासमोरच आमरण उपोषण करू, असा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिलाय.
महाराष्ट्राच्या मातीत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यासह ‘महाराष्ट्र केसरी’, ‘हिंद केसरी’ घडले आहेत, मात्र कुस्तीतील दोन संघटनांच्या वादामध्ये पैलवांनाची गोची झाली आहे. त्यामुळे येत्या 1 मार्चपर्यंत शासनाने संघटनांमधील वाद मिटवावा, ‘एक राज्य, एक खेळ आणि एक संघटना’ ही संकल्पना राबवावी, राज्यात वर्षात एकदाच ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा आयोजित करावी, ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस द्यावे, तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ होणाJdयास थेट पोलीस उपअधीक्षक केले जाते. त्याचप्रमाणे एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ झाल्यास त्या पैलवानास पोलीस उपनिरीक्षक करावे, पैलवान शिवराज राक्षे, पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावरील बंदी हटवावी, राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये पैलवानांची डोपिंग चाचणी करावी या मागण्यांसह आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांना भेटणार आहे.