निवडून येताच मिंधे गटाच्या चंद्रदीप नरकेंचा उन्माद; महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या काकांच्या घरात फोडले फटाके, वाहनांचेही नुकसान

करवीर विधानसभा मतदारसंघात अगदी थोडय़ाशा मतांनी विजयी झालेल्या महायुतीच्या मिंधे गटाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रदीप नरके यांच्या विजयाचा किळसवाणा उन्माद समोर आला आहे. ज्यांच्या बोटाला धरून राजकारणात आले, ज्यांच्या बळावर दहा वर्षे आमदारकी, तसेच साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले ते 82 वर्षांचे काका अरुण नरके घरात एकटेच असल्याचे पाहून निकालाच्या दिवशी मध्यरात्री चंद्रदीप नरके यांच्या काही समर्थकांनी घरात घुसून गुलालाची नाहक उधळण केली. फटाक्यांच्या माळाही लावल्या.

फटाक्यांमुळे दारातील तुळशीसह अन्य वनस्पतींची नासधूस झाली. शिवाय चारचाकी वाहनांवरही हे टोळके नाचल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान काका अरुण नरके यांनी महाविकास आघाडीला साथ दिली म्हणून चंद्रदीप नरपेंनी हा उन्माद केल्याची चर्चा आहे. नरपेंच्या विजयाच्या उन्मादाचे हे व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांतून समोर येत आहेत.

उन्माद करणाऱ्यांमध्ये चंद्रदीप नरके यांच्या मुलाचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. निकालादिवशी अरुण नरके हे घरी एकटेच असल्याची संधी साधत मध्यरात्री चंद्रदीप नरके यांचा मुलगा आपल्या मित्रांसह अरुण नरके यांच्या घरात घुसला. त्यांनी गुलालाची पोती त्यांच्या पायऱ्यांसह दारावर ओतली. त्यानंतर फटाक्यांच्या माळा पेटवून दारावर टाकल्या. यामध्ये दारातील तुळशीसह इतर झाडे पेटली.

सतेज पाटील यांच्यासोबत गेल्याचा राग

लोकसभा निवडणुकीपासून अरुण नरके, ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत गेले. त्यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांचा प्रचार केल्याचा राग चंद्रदीप नरके यांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच निकालानंतर ‘एका-एकाला बघून घेतो, सोडणार नाही,’ असे चंद्रदीप नरके मोठय़ाने ओरडत होते. सध्या या उन्मादाविरोधात शिवाजी पेठेसह करवीर मतदारसंघात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागल्याचे दिसून येत आहे.