केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सत्ता स्थापनेमागे किंगमेकरच्या भूमिकेत असलेले तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू कुटुंबही याच काळात मालामाल झाले आहे. एक्झिट पोलनंतर पाच दिवसांत त्यांच्या हेरिटेज फुड्स कंपनीचे शेअर्स तब्बल 55 टक्क्यांनी वधारले. यामुळे नायडू कुटुंबीयांतील सदस्यांची संपत्ती तब्बल 870 कोटींनी वाढली. यात चंद्राबाबूंच्या पत्नीच्या खात्यात तर खटाखट… खटाखट…. 584 कोटी रुपयांची भर पडली आहे.
केंद्रात भाजपला बहुमत मिळणार आणि आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्षाची सत्ता येणार असा अंदाज एक्झिट पोलने 1 जूनला वर्तविला होता. हा अंदाज आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीपुरता खरा ठरला. चंद्राबाबूंच्या तेलगू देसमला बहुमत मिळाले. लोकसभेला 16 खासदार निवडून आल्याने ते केंद्रात किंगमेकर बनले. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे शेअर बाजारात मात्र चंद्राबाबूंच्या कंपनीने त्यांना मालामाल केले.
हेरिटेज फूड्स कंपनी
– या कंपनीचे दोन व्यवसाय विभाग आहेत – दुग्धव्यवसाय आणि अक्षय ऊर्जा. सध्या हेरिटेजचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, महाराष्ट्र, ओडिशा, एनसीआर दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये उपलब्ध आहेत.
– स्टॉक एक्सेंजवरील माहितीनुसार, चंद्राबाबू यांच्या कुटुंबाकडे कंपनीचा 35.7 टक्के हिस्सा आहे. चंद्राबाबू यांच्या पत्नीकडे 2,26,11,525 शेअर्स तर मुलगा लोकेश यांच्याकडे 1,00,37,453 शेअर्स आहेत. सून ब्राह्मणी यांच्याकडे अनुक्रमे 10.82 टक्के आणि 0.46 टक्के हिस्सा आहे. नातू देवांशकडेही 0.06 टक्के हिस्सा आहे.
शेकडो कोटींची संपत्ती वाढली
– चंद्राबाबू यांनी 1992 मध्ये स्थापन केलेल्या हेरिटेज फुड्स लिमिटेड या पंपनीच्या शेअरचा दर 31 मे रोजी 402 रुपये 90 पैसे होता. आज शुक्रवारी या शेअरचा दर 639.25 रुपयांवर पोहोचला. पाच दिवसांत शेअरचे भाव 55 टक्क्यांनी वधारले.
– यामुळे हेरिटेज फुड्सचे भांडवली बाजार मुल्यात तब्बल 2400 कोटी रुपयांनी वाढ झाली.
– हेरिटेज फुड्सच्या मुख्य प्रवर्तक असलेल्या चंद्राबाबूंच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या शेअर्सचे मुल्य वाढल्यामुळे संपत्तीत 584 कोटींची वाढ झाली. मुलगा लोकेशची संपत्ती 236 कोटींनी वाढली. कुटुंबातील उर्वरित सदस्यांच्या संपत्तीतही 299 कोटींची भर पडली. पाच दिवसांत नायडू कुटुंबाची संपत्ती 870 कोटींनी वाढल्याने ते मालामाल झाले.