चंद्राबाबूंना 4 तर नितीशना 2 मंत्रिपदे; महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा

लोकसभा निवडणुकीत भाजपला एकटय़ाला बहुमत मिळू शकले नाही. यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत असताना एनडीएच्या घटक पक्षांत मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला  4  तर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूला दोन मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनाही मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभेत भाजपची गाडी 240 वरच अडकल्याने केंद्रात सरकार स्थापन करताना 272 हा बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी एनडीएतील मित्रपक्षांची भाजपला गरज आहे. टीडीपीच्या 16 आणि जेडीयूच्या 12 जागा सत्तास्थापनेसाठी महत्त्वाच्या आहेत. भाजपला एकटय़ाला बहुमत मिळू शकले नाही, त्यामुळे मित्रपक्षांचेही ऐकावे लागणार आहे. यासाठी भाजपकडून उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमधून आपल्या मंत्र्यांची संख्या कमी करून मित्रपक्षांना अधिक संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपपाठोपाठ एनडीएतील  सर्वात मोठा पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने अर्थ मंत्रालयासह लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे, मात्र महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवून एखादे अधिकचे मंत्रीपद टीडीपीला देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात टीडीपीकडून राममोहन नायडू, हरीश बालयोगी, दग्गुमल्ला प्रसाद आणि पेम्मासानी चंद्रशेखर यांना कॅबिनेट मंत्रीपदावर संधी मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे

राजनाथ सिंह, जितिन प्रसाद, एस.पी. सिंग बघेल, पंकज चौधरी, अमित शहा, मनसुख मांडविया, ज्योतिरादित्य सिंधिया, शिवराजसिंह चौहान, राव इंद्रजीत, कृष्णपाल गुर्जर, मनोहरलाल खट्टर, अर्जुन मेघवाल, भूपेंद्र यादव, वैजयंत पांडा, अपराजिता सारंगी यांना भाजपकडून मंत्रीपद मिळण्याची संधी आहे, तर मित्रपक्षांचे जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल, रामदास आठवले यांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मोठी भूमिका मिळू शकते. नव्या मंत्रिमंडळात दोन महिला मंत्र्यांचाही समावेश केला जाऊ शकतो. यापैकी दिल्लीच्या खासदार बान्सुरी स्वराज यांना राज्यमंत्री केले जाऊ शकते.

गडकरी, गोयल, राणेही मंत्रिमंडळात

महाराष्ट्रातून भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता अजित पवार गटाला लोकसभेत एक जागा मिळाल्यावरही एक कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार असून त्यासाठी प्रफुल्ल पटेल यांची चर्चा आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

कुमारस्वामी यांना संधी

एनडीएचा घटक पक्ष असलेल्या कर्नाटकातील जेडीएसचे खासदार माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना मंत्री केले जाऊ शकते. केरळमध्ये भाजपला पहिली जागा मिळालेल्या सुरेश गोपी यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

पराभूत होऊनही मंत्रीपद मिळणार

भाजपकडून लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या 50 पैकी 19 मंत्री पराभूत झाले. निवडणुकीत पराभूत होऊनही स्मृती इराणी आणि राजीव चंद्रशेखर यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच मुझफ्फरनगरमधील संजीव बालियान यांना पराभव होऊनही मंत्री केले जाऊ शकते.

जदयूकडून रामचरण ठाकूर आणि लल्लन सिंह यांची वर्णी

एनडीए सरकारमध्ये जेडीयूला दोन मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता राज्यातील जातीय समीकरणे लक्षात घेऊन राज्यसभा सदस्य रामनाथ ठाकूर यांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे. रामनाथ हे अलीकडेच भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले स्व. कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र आहेत. राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांचीही कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लावण्यात येणार आहे. लल्लन सिंह हे जेडीयूचे माजी अध्यक्ष असून मुंगेर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.