![chandranamskar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/chandranamskar-696x447.jpg)
आकाशात अर्धा चंद्र दिसू लागला… इकडे तरुण भारत क्रीडांगणावर रांगेत शिस्तबद्ध उभे राहण्याची लगबग सुरू झाली. सायंकाळचे सात वाजले. संगीत सुरू झाले आणि लयबद्धपणे ‘चंद्र नमस्कार’ योग सुरू झाले. एक-दोन नव्हे तर तब्बल 1200 मुलींनी एकावेळी चंद्र नमस्कार केले. एशिया बुक, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी हा उपक्रम झाल्याचे सांगण्यात येते.
लेझीम, सूर्य नमस्कार, सायकलिंग अशा क्रीडा प्रकारातील उपक्रमांची एशिया बुकमध्ये नोंद आहे. चंद्र नमस्काराचा वेगळा प्रयोग घेऊन आज 1200 मुली तरुण भारत क्रीडांगणावर जमल्या होत्या. तरुण भारत व्यायाम मंडळ, अॅब्सॅल्युट फिटनेस सेंटर यांच्या विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. एक तास हा उपक्रम सुरू होता. लहान मुलींसह, वृद्ध महिलांनी सहभाग घेतला. विक्रम नोंदीसाठी चंद्र नमस्कार हा स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. या मुलींनी 21 वेळा चंद्र नमस्कार घातले. अर्जुन पुरस्कार विजेते ज्येष्ठ खेळाडू मुरलीकांत पेटकर, जीएसटी उपायुक्त सुनील कानुगडे, ज्येष्ठ व्यापारी मनोहर सारडा, अश्विनी जिरंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुलींनी ‘चंद्र नमस्कार’ योगाचे एकवीस प्रकार संगीताच्या तालावर सादर केले. अॅब्सॅल्युट फिटनेस सेंटरच्या संचालक अर्चना कुलकर्णी आणि डॉ. मनोज तिलादी यांनी चंद्र नमस्कार प्रात्यक्षिक केले. गौरी सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले.