बिष्णोई गँगची रॅपर बादशाहला धमकी, चंदीगडमध्ये रेस्टॉरंजवळ गावठी बॉम्बचा स्फोट

चंदीगडच्या सेक्टर 26 मध्ये मंगळवारी पहाटे दोन नाइट क्लबमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गोल्डी बराड आणि रोहित गोदार यांनी घेतली आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दोघांनी या स्फोटाची जबाबदारी स्विकारली आहे. सोशल मीडिया पोस्टवर दावा केला की, ज्या सिल्व्हर रेस्टॉरेण्टवर स्फोट घडवून आणला त्याचा मालक गायक आणि रॅपर बादशहा आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हॉटेलचा मालक असलेल्या बादशहाला खंडणीसाठी फोन केला होता. मात्र त्याने तो उचलला नाही. मात्र सोशल मीडिया पोस्टची पुष्टी केलेली नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

दोन अज्ञात बाइकस्वारांनी संशयित स्फोटके फेकली होती. संशयितांनी मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा स्फोट घडवला. हा फार कमी क्षमतेचा स्फोट होता. त्यामुळे या स्फोटात कोणीही जखमी झालेले नाही. घटनेच्या व्हिडिओमध्ये क्लबच्या तुटलेल्या खिडक्या दिसत आहेत. स्फोटाची माहिती मिळताच चंदीगड पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळावरून नमुने गोळा करण्यासाठी बॉम्ब निकामी पथक आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबचे पथकही घटनास्थळी पोहोचले.

चंदीगड पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचा वापर करून घरगुती बॉम्ब बनवून चंदीगडच्या नाईट क्लबच्या बाहेर स्फोट घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळावरून काही ज्यूटचे दोरही जप्त करण्यात आले आहेत. स्फोट झाला तेव्हा नाईट क्लब बंद होते. अशा परिस्थितीत हे बॉम्बस्फोट केवळ दहशत पसरवण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे मानले जात आहे. प्राथमिक तपासात नाईट क्लबच्या मालकांमध्ये दहशत पसरवून या स्फोटामागे खंडणी अँगल असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. चंदीगड पोलीस फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.