![Rachin Ravindra](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Rachin-Ravindra-696x447.jpg)
चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलेली असतानाच न्यूझीलंडसाठी डोकेदुखी वाढवणारी घटना घडली आहे. शनिवारी लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना झेल पकडण्याच्या नादात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र गंभीर जखमी झाला आहे. चेंडू डोक्यावर आदळल्याने रचिनच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे तो थेट मैदानावरच कोसळला. त्यामुले आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीत तो खेळतो की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिकेसाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकन संघ दाखल झाले आहेत. शनिवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीत डावाच्या 38व्या षटकात रवींद्रच्या चेहऱयावर जोरात चेंडू लागला. खुशदिल शाहने डीपमध्ये शॉट खेळला. रचिनने तो पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातातून चेंडू निसटला. त्यानंतर चेंडू त्याच्या चेहऱयावर जोरात लागला आणि डोक्यातून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. मागे प्रेक्षक असल्यामुळे रचिनला चेंडू दिसला नसावा.