Champions Trophy हिंदुस्थानात येणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

हिंदुस्थानने दणका दिल्यामुळे ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाकव्याप्त काश्मिरमधील दौरा रद्द करण्याचे आदेश पाकिस्तानला दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. अशातच ICC ने ट्रॉफीच्या संपूर्ण दौऱ्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातील ट्रॉफी हिंदुस्थानात दाखल होणार आहे.

पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम सुरू होणार असून 9 मार्च पर्यंत स्पर्धा रंगणार आहे. टीम इंडिया पाकिस्तानात खेळायला जाणार नाही. त्यामुळे हायब्रीड पद्धतीने स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. स्पर्धा सुरू होण्यासाठी अजून बराच वेळ बाकी आहे. अशातच 14 नोव्हेंबर रोजी ट्रॉफी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहे. या ट्रॉफीचा दौरा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आला होता. मात्र, हिंदुस्थानने विरोध केल्यामुळे आयसीसीने पाकव्याप्त काश्मीरचा दौर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर आयसीसीने ट्रॉफीच्या दौऱ्या संदर्भात संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 16 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ट्रॉफी संपूर्ण पाकिस्तानमध्ये फिरवण्यात येईल. तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर K2 वर सुद्धा ट्रॉफी घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर 26 ते 28 नोव्हेंबर अफगानिस्तान, 10 ते 13 डिसेंबर बांगलादेश, 15 ते 22 डिसेंबर दक्षिण आफ्रिका, 25 डिसेंबर ते 5 जानेवारी ऑस्ट्रेलिया, 6 ते 11 जानेवारी न्यूझीलंड, 12 ते 14 जानेवारी इंग्लंड आणि 15 ते 26 जानेवारी हिंदुस्थानमध्ये ट्रॉफी येणार आहे.