Champions Trophy 2025 – विराट कोहली ठरणार सर्वाधिक धावा करणारा फलंदाज? ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम धोक्यात

दोन दिवसांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमाका सुरू होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना 20 फेब्रुवारीला दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीवर चाहत्यांच्या विशेष नजरा असणार आहेत. तसेच त्याच्याकडून संघाला सुद्धा दमदार खेळाची अपेक्षा आहे. कारण आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्याचा हाच फॉर्म कायम राहिल्यास वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू क्रिस गेलचा विक्रम मोडित निघण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने या स्पर्धेत 17 सामने खेळले असून 52.73 च्या सरासरीने 88.77 च्या स्ट्राईक रेटने 791 धावा चोपून काढल्या आहेत. यामध्ये एक अर्धशतक आणि तीन झंझावाती शतकांचा समावेश आहे. परंतु क्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे विराट कोहलीला हा विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले असून 88.16 च्या सरासरीने आणि 92.32 च्या स्ट्राईक रेटने 529 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. क्रिस गेलचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढण्यासाठी विराट कोहलीला फक्त 263 धावांची आवश्यकता आहे. विराट कोहलीने 263 धावांचा टप्पा पार केल्यास तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.

ICC Champions Trophy 2025 – हिंदुस्थानला ‘चॅम्पियन्स’ होण्याची संधी