टीम इंडियाचे मुख्य भ्रमास्त्र जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सिडनी कसोटीमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे सामना अर्धवट सोडून त्याला मैदान सोडावं लागलं होतं. याचा टीम इंडियाचा जोरदार फटका बसला आणि संघाचा पराभव झाला. आगमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त आहे का नाही? यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
बॉर्डर गावस्कर करंडकातील पाचवी कसोटी सिडनीमध्ये खेळवण्यात आली. या सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव झाला. या सामन्यात जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दुसऱ्या डावात खेळू शकला नाही. परंतु आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचे संघात असणे अत्यंत गरजेचे आहे. पीटीआईने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहची दुखापत कितपत गंभीर आहे. याची ठोस माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. परंतु जर त्याला ग्रेड एकची दुखापत झाली असेल, तर त्याला मैदानात उतरण्यासाठी दोन तीन दिवस लागतील. जर त्याला ग्रेड दोनची दुखापत झाली असेल, तर त्याला मैदानात उतरण्यासाठी 6 आठवड्यांचा कालावधी लागेल. तसेच जर त्याला ग्रेड तीनची दुखापत झाली असेल, तर त्याला 3 महिने मैदानापासून लांब रहावे लागणार आहे.