Champions Trophy 2025 – टीम इंडियानंतर पंच नितीन मेनन व सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांचा पाकिस्तानला जाण्यास नकार

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉ़फी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदाची स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे बीसीसीआयने ठणकावून सांगितले होते. त्यामुळे हिंदुस्थानचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या धक्क्यातून बाहेर येत नाही तोच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पंच नितीन मेनन यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. तर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनीही हात वर केले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.

नितीन मेनन हे आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंच असून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांच्या नावाची चर्चा होता. मात्र आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये त्यांचे नाव नव्हते. नितीन मेनन यांनी वैयक्तिक कारणामुळे पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही.

नितीन मेनन हे हिंदुस्थानचे अनुभवी पंच आहेत. त्यांनी 40 कसोटी सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. यासह 75 वन -डे आणि 75 टी-20 सामन्यांचाही अनुभव त्यांना आहे. दुसरीकडे सामनाधिकारी जवानल श्रीनाथ यांनीही नितीन मेनन यांच्या प्रमाणे पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंचांची यादी

कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मिचेल गॉफ, ॲड्रियन होल्डस्टोक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिटर्ड केटलब्रू, एहसान रझा, पॉल रायफल, शरफुद्दौला इब्ने शाहिद, रॉडनी टकर, अलेक्स व्हार्फ आणि जोएल विल्सन

सामनाधिकारी –

डेव्हिड बून, रंजन मदुगले, ॲण्ड्रयू पायक्रॉफ्ट