Champions Trophy 2025 – उद्या होणार टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

ICC Champions Trophy 2025 ची सुरुवात पुढच्या महिन्यात होणार आहे. 19 फेब्रुवारीला पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कराची येथे खेळवला जाणार आहे. सदर स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सहा संघांनी आपले संघ घोषित केले आहेत. टीम इंडियाची घोषणा उद्या म्हणजेच 18 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.

चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानाली कराची, रावळपिंडी आणि लाहोर या तीन शहांमध्ये खेळवली जाणार आहे. तसेच हिंदुस्थानचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. मात्र अद्याप संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु पाकिस्तान सोडून उर्वरित सहा संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा शनिवारी (18 जानेवारी 2025) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. संघ निवड करण्यात आल्यानंतर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषदेमध्ये संघाची घोषणा करतील. यावेळी त्यांच्यासोबत कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित असतील.

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखपतीमुळे बराच काळ संघातून बाहेर आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच त्यांची इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फिरकीपटू कुलदीप यादवची सुद्धा संघात निवड होण्याची शक्यता आहे. यशस्वी जयस्वालनेही आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने त्याला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. तसेच संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

ICC स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना स्पर्धा सुरू होण्याच्या 1 महिन्यापूर्वी आपापल्या संघांची घोषणा करणे बंधनकारक आहे. परंतु यावेळी सर्व संघांना पाच आठवड्यांपूर्वीच खेळाडूंची यादी देण्यात यावी, असे सांगण्यात आले होते. याची अंतिम मुदत 12 जानेवारी ठेवण्यात आली होती. परंतु नंतर तारीख पुढे ढकलण्यात आली.