‘गंभीर’ प्रयोग महागात पडणार! पंतला संघात स्थान नसल्याबद्दल आश्चर्य

ऑस्ट्रेलियातील दारुण अपयशानंतर हिंदुस्थानी संघात केले जाणारे ‘गंभीर’ प्रयोग आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीतही आजमावले गेले तर संघाला ते महागात पडणार, अशी शक्यता क्रिकेटतज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडियाचे व्यवस्थापन आता नेमका कोणता प्रयोग करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत सध्या संघाबाहेर दिसतोय. त्याच्या संघात नसण्याबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तो बाकावर बसलाय ते त्याच्या अपयशी खेळामुळे नव्हे. तो प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सुरू असलेल्या प्रयोगांमुळे संघाबाहेर आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हिंदुस्थानने निर्भेळ यश मिळवले, पण या संघात ऋषभ पंत नव्हता. हे साऱ्यांनाच खटकले होते. पण पंतला संघाबाहेर ठेवण्याचा प्रयोग का केला जात होता, याचे उत्तर खुद्द गंभीर यांनाच माहीत असावे. पूर्वी यष्टिरक्षक फलंदाज असलेला के. एल. राहुल संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरत होता म्हणून त्याची ‘स्पेशालिस्ट फलंदाज’अशी संघात वर्णी लावण्यात आली.

आता पुन्हा तो संघाबाहेर जाण्याच्या स्थितीत असताना त्याच्या हातात यष्टिरक्षणासाठी ग्लोव्हज चढवण्यात आले आहेत. हिंदुस्थानी संघात पंतच्या साथीने ईशान किशन, संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलसारखे आक्रमक यष्टिरक्षक असताना राहुलच्या हातात ग्लोव्हज चढवण्याचा प्रकार कोणाच्याही पचनी पडलेला नाही. हा प्रकार चॅम्पियन्स ट्रॉफीतही कायम राहिला तर संघाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे क्रिकेटतज्ञांचेच नव्हे, तर दिग्गज क्रिकेटपटूंचेही मत आहे. त्यामुळे आगामी मालिकेत पंत पुन्हा एकदा यष्टिरक्षण करताना दिसेल अशी अपेक्षा आहे.

पंतच्या गुडघ्याला दुखापत

दुबईत दाखल झालेला हिंदुस्थानी संघ सध्या जोरदार सराव करतोय. अष्टपैलू हार्दिक पंडय़ा फलंदाजीचा सराव करताना त्याने मारलेला एक जोरदार फटका पंतच्या गुडघ्यावर आदळला आणि तो तिथेच कळवळत खाली बसला. पंतच्या वेदना पाहून फिजिओ धावत त्याच्याजवळ गेला आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन आला. ज्या वेगाने चेंडू पंतच्या गुडघ्यावर आदळला त्यावरून फटका जोरात बसल्याचे दिसत होते. यामुळे सारेच चिंतीत झाले होते. पण काही वेळाने पंत पॅड बांधून नेट्समध्ये फलंदाजीसाठी उतरला. हे पाहून साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. पंतची दुखापत गंभीर नसून तो फिट असल्याचे प्रथमदर्शनी दिसतेय. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हिंदुस्थानी संघात फार मोठे ‘गंभीर’ बदल नसतील, असा सर्वांना विश्वास आहे.