
यजमान पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत एकही विजय मिळविता न आल्याने चाहते कमालीचे निराश झाले. त्यांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली. न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या उपांत्य सामन्यात गद्दाफी स्टेडियम रिकामं राहिलं अन् क्रिकेट जगतात आपली नाचक्की होईल, अशी भीती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) वाटली. त्यामुळे त्यांनी ‘मॅचची तिकिटं घ्या अन् इफ्तार पार्टीला या’, अशी जाहिरात करून सामन्यासाठी गर्दी जमवली.
न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका दरम्यानचा उपांत्य सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर गर्दी जमली होती. मात्र, ही गर्दी क्रिकेटप्रेमींची नसून, इफ्तार पार्टीच्या आमिषाने आली होती, हे पाकिस्तानचं पितळ आता उघडं पडलंय. कारण फुकट जेवण मिळणार म्हणून लाहोरच्या स्टेडियमवर गर्दी झाली होती. मात्र, या इफ्तार पार्टीच्या नावाखाली केवळ दोन खजूर, प्रूट ज्यूसचं पाकीट आणि एक मिनी पिझ्झा एवढंच देण्यात आलं होतं. त्यामुळे आपल्याला इफ्तार पार्टीच्या नावाखाली छोटासा बॉक्स देऊन खोटं बोलून स्टेडियमवर आणलं गेलंय, ही बाब पाकिस्तानी नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे सामन्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी पीसीबीला शिव्यांची लाखोली वाहिली.