चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन 2025 साली पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात यावी अशी मागणी हिंदुस्थानने लावून धरली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार असल्याचे ICC ने जाहीर केले आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सर्व सामने पाकिस्तानच्या बाहेर खेळवण्यात येणार आहेत.
ICC ने गुरुवारी (19 डिसेंबर 2024) चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तसेच टीम इंडियाचे सर्व सामने पाकिस्तानच्या बाहेर होतील. तसेच जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर हा फायनलचा सामनाही पाकिस्तामध्ये खेळवण्यात येणार नाही. त्याच बरोबर 2024 ते 2027 या कालावधीत हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये पार पडणाऱ्या ICC च्या सर्व स्पर्धा या हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात येणार असल्याचे सुद्धा ICC ने जाहीर केले आहे.
ICC ने 2024 ते 2028 या कालावधीत पार पडणाऱ्या स्पर्धांचे यजमानपद कोणत्या देशांना देणार याची सुद्धा घोषणा केली आहे. त्यानुसार, 2025 साली पार पडणाऱ्या महिला विश्वचषकाचे यजमानपद हिंदुस्थानला देण्यात आले आहे. तसेच 2026 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोन देशांना संयुक्तरित्या देण्यात आले आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानात येण्यास नकार दिल्यामुळे सदर स्पर्धा हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये संयुक्तरित्या खेळवण्यात येईल. तसेच 2028 साली टी-20 विश्वचषक पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच ICC च्या माध्यमातून वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.