Champions Trophy 2025 – ऑस्ट्रेलिया-इंग्लंड लढतीआधी लाहोरच्या गद्दाफी मैदानावर वाजलं हिंदुस्थानचं राष्ट्रगीत

पाकिस्तानमधील लाहोर शहरातील गद्दाफी मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात सामना सुरू आहे. हा सामना सुरू होण्याआधी आयोजकांकडून एक मोठी चूक झाली. सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात असताना चुकून हिंदुस्थानचे राष्ट्रगीत लावण्यात आले. यामुळे मैदानावरील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूही चकीत झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची धूम आहे. तब्बल 29 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आयसीसी स्पर्धा होत आहे. मात्र सुरुवातीपासून ढिसाळ कारभारामुळे पाकिस्तानवर टीकेचा वर्षाव होत होता. त्यात शनिवारी आणखी एका गोष्टीची भर पडली. लाहोरच्या गद्दाफी मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू होणार होता. दोन्ही संघाचे खेळाडू आपापल्या देशाच्या राष्ट्रगीतासाठी मैदानात उभे राहिले. सुरुवातीला इंग्लंडचे राष्ट्रगीत झाले आणि नंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजण्याऐवजी हिंदुस्थानचे राष्ट्रगीत ‘जन गण मन…’ सुरू झाले. अर्थात काही सेकंदच हा गोंधळ उडाला आणि त्यानंतर ही चूक सुधारण्यात आली. मात्र तोपर्यंत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता.

तिरंगा फडकला

हिंदुस्थानी संघाने सुरक्षेच्या कारणामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे हिंदुस्थानचे सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत. पहिल्या लढतीत हिंदुस्थानने बांगलादेशचा फडशा पाडला असून दुसऱ्या लढतीत रोहितसेनेपुढे पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. रविवारी 23 फेब्रुवारीला हा सामना रंगणार आहे. हिंदुस्थानचे सामने दुबईत होत असल्याने पाकिस्तानच्या मैदानांवरुन हिंदुस्थानचा तिरंगा गायब करण्यात आला होता. याची चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानी मैदानावर तिरंगा फडकताना दिसला. त्यानंतर आता इंग्लंड-ऑस्ट्रेलिया लढतीत चुकून का होईना पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानचे राष्ट्रगीतही वाजले.