
टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव करून टीम इंडियनं स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. या विजयासह हिंदुस्थानी संघानं ग्रुप अ मध्ये टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यातही यश मिळवले आहे. या सामन्यात मोहम्मद शमी आणि शुभमन गिल हे टीम इंडियाचे विजयाचे हिरो ठरले आहेत. रोहित शर्मानं वादळी खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. नाबाद शतक ठोकल्याबद्दल शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आलं.
या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. 35 धावांत 5 विकेट पडल्या होत्या. सामन्यात एक वेळ अशी आली की, बांगलादेशला 125 धावा करणेही कठीण वाटत होतं. पण झाकीर अली आणि तौहीद हृदयॉय यांनी 154 धावांची भागीदारी करून बांगलादेशला सामन्यात परत आणलं. झाकीर अली 68 धावा करून बाद झाला, पण तौहीद हृदयॉयने शतक झळकावून संघाला चांगल्या स्थितीत आणलं.
बांगलादेश संघाने 49.4 षटकांत सर्व विकेट गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणा यांनी तीन आणि अक्षर पटेल यांनी एकाच षटकात दोन बळी घेतले. यातच 229 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिलसह हिंदुस्थानाला वादळी सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 36 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. तोपर्यंत धावसंख्या 70 च्या जवळ पोहोचली होती. यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यात एक छोटीशी भागीदारी झाली. यादरम्यान, विराट कोहली 22 धावा करून बाद झाला. यावेळी शुभमन गिल एका टोकाला ठामपणे उभा राहून हिंदुस्थानची बाजू सामन्यात पकडून होता. त्याने श्रेयस अय्यर (15) आणि अक्षर पटेल (8) सोबत काही धावा केल्या. केएल राहुलसोबतच्या त्याच्या भागीदारीने सामना जिंकला. शुभमन गिलने 125 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टीम इंडियाने हे लक्ष्य 46.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले आणि गट अ मध्ये दुसरे स्थान मिळवले.