टीम इंडिया पाकिस्तानच्या स्वारीवर जाणार? …तर लाहोरमध्ये 1 मार्चला भिडणार कट्टर प्रतिस्पर्धी

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवलं. मात्र हे कट्टर प्रतिस्पर्धी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने आगामी वर्षी पुन्हा एकदा एकमेकांना भिडणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असून हिंदुस्थान-पाकिस्तान सामना 1 मार्चला लाहोरमध्ये रंगणार आहे, मात्र टीम इंडिया पाकिस्तानच्या स्वारीवर जाणार की नाही याबाबत ‘बीसीसीआय’कडून अद्यापि अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीसीबीने हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचे आयोजन लाहोरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन ट्रॉफी आगामी वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च यादरम्यान होणार आहे. 10 मार्च रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 9 मार्चला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. फायनलचा थरारही लाहोरमध्येच रंगणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीसाठी पीसीबीकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही  हे अद्यापि स्पष्ट झालेले नाहीये. केंद्र सरकारकडून हिरवा पंदील मिळाल्याशिवाय बीसीसीआयला हिंदुस्थानी संघाला पाकिस्तान दौऱयावर पाठवता येणार नाही. दोन दशकांपासून हिंदुस्थानी संघ पाकिस्तानच्या दौऱयावर गेलेला नाही. आशिया चषकावेळीही असाच तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी हायब्रेड मॉडेलनुसार हिंदुस्थानी संघाचे सामने तटस्थ ठिकाणी झाले होते, मात्र यावेळी ही आयसीसीची स्पर्धा आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेणार? याकडे तमाम देशवासीयांचे लक्ष असेल.

टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये?

मीडिया रिपोर्टनुसार, पीसीबी चेअरमन मोहसीन नक्वी हे टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलसाठी बार्बाडोसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 15 सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीकडे सोपविले. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. येथे कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. लाहोरमध्ये सात सामने खेळवले जाणार आहेत. तीन सामने कराचीत, तर रावळपिंडीत पाच सामने होणार आहेत.

हिंदुस्थान, पाकिस्तान गटात

पाकिस्तानमध्ये होणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी अर्थातच एका गटात म्हणजे ‘अ’ गटात असतील. या गटात बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांना ठेवण्यात आलेय.  ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरी गाठतील.