क्रिकेट विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि पारंपरिक लढत असा लौकिक असलेल्या हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील साखळी सामन्याची तिकिटे अवघ्या तासाभरातच सोल्ड आउट झाली. येत्या 23 फेब्रुवारीला हायब्रीड मॉडेलनुसार दुबईमध्ये हा सामना खेळविला जाणार आहे.
येत्या 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. हिंदुस्थानचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. गेल्याच महिन्यात या स्पर्धेच्या तिकीटविक्रीला प्रारंभ झाला होता; मात्र हिंदुस्थानच्या लढतींची तिकीटविक्री आज 3 फेब्रुवारीपासून सुरू झाली. त्यापैकी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित हाय व्होल्टेज सामन्याची तिकिटे विकत घेण्यासाठी जगभरातील लाखो क्रिकेटप्रेमी आयसीसीच्या संकेतस्थळावर तुटून पडले होते. आज सायंकाळी तिकीटविक्री सुरू होताच अवघ्या तासाभरातच सर्व तिकिटे विकली गेली. या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट 125 दिरहम (3000 रुपये) तर महागडे तिकीट 5000 दिरहम (1 लाख 20 हजार रु.) होते. मात्र हिंदुस्थानच्या अन्य लढतींची तिकिटे अजूनही उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानात होणारा एकही सामना अद्याप सोल्ड आउट झालेला नाही.