Champions Trophy 2025 – चाहत्याने लाहोरच्या स्टेडियमवर झळकावला तिरंगा, पोलिसांनी घेतलं ताब्यात

पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम सुरू आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा पाकिस्तानात खेळली जात आहे. विविध कारणांमुळे सुरुवातीपासूनच पाकिस्तानात धुसफुस सुरू आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर हिंदुस्थानचा तिरंगा न लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा तिरंग्यावरुन वाद निर्माण झाला आहे. हिंदुस्थानचा तिरंगा घेऊन सामना पाहणाऱ्या एका चाहत्याला चालू सामन्यातून पोलिसांनी बाहेर काढले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतून गट ‘अ’ मधून यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ बाहेर फेकले आहेत. तर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड हे संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरले आहेत. तर गट ‘ब’ मधून कोणते संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरणार हे अद्याप निश्चित नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या सामन्यादरम्यान एक चाहता हिंदुस्थानी तिरंगा घेऊन स्टेडियमध्ये दाखल झाला होता. त्यावरुन बराच वाद झाला आहे. पोलिसांनी आणि सुरक्षारक्षकांनी संबंधित चाहत्याला ताब्यात घेतले आहे. चाहत्याच्या हातामध्ये हिंदुस्थानी तिरंगा दिसत आहे. तसेच त्याला मारण्यात आल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.