
पाकिस्तानात सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शनिवारी (22 फेब्रुवारी 2025) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत सुरू आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा सलामीचा फलंजाज बेन डकेटने कंगारुंना आपल्या फलंदाजीचा तडाखा दिला आहे. त्याने 165 धावांची शतकीय पारी खेळत इतिहास रचला आहे.
बेन डकेटने सलामीला येत 143 चेंडूमध्ये 17 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 165 धावाची वादळी खेळी केली. चॅम्पियन्य ट्रॉफीमध्ये आतापर्यंतच्या सर्वोत्तम खेळीचा बहुमान त्याने पटकावला आहे. डकेटने न्यूझीलंडच्या नॅथन अॅस्टल आणि झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवराच विक्रम मोडीत काढला आहे. अँडी फ्लॉवरने 2002 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाविरुद्ध 145 धावांची खेळी केली होती. तर नॅथन अॅस्टलने 2004 साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अमेरिकेविरुद्ध 145 धावा केल्या होत्या. या दोघांचाही सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बेन डकेटने मोडित काढला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर सौरव गांगुली (141 धावा), पाचव्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (141 धावा) आणि सहाव्या क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ (141 धावा) या खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या सामना सुरू असून. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 351 धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे.