
यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवून दमदार सलामी देणारा न्यूझीलंडचा संघ उद्या बांगलादेशला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे सलामीच्या लढतीत हिंदुस्थानकडून पराभूत झालेल्या बांगलादेशसाठी सोमवारची लढत म्हणजे ‘जिंका किंवा मरा’ अशीच आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी बांगलादेशला आता विजयाशिवाय पर्याय उरलेला नाहीय.
न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ केला होता. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या लढतीत त्यांचे मनोबल उंचावलेले असेल. मात्र दुखापतीतून सावरलेल्या रचिन रवींद्रसाठी कोणाला बाकावर बसवायचे, हा प्रश्न न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनापुढे असेल. दुसरीकडे बांगलादेशचे खेळाडू हिंदुस्थानविरुद्धच्या लढतीत सर्वच स्तरावर अपयशी ठरले होते. त्यामुळे या पराभवातून सावरून ते कुठल्या मानसिकतेत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत उतरतात, यावरही बरेच काही अवलंबून असेल.
अनुभवी सौम्या सरकारचा हरवलेला फॉर्म बांगलादेशसाठी चिंतेचा विषय आहे. याचबरोबर कर्णधार नजमुल हुसैन शांतोसह मुश्फिकुर रहीम, तौहीद हृदोय, जाकर अली, महमुदुल्लाह, मेहदी हसन यांनाही फलंदाजीत योगदान द्यावे लागणार आहे. न्यूझीलंडकडे मॅट हेन्री, विलियम ओ’रुर्के, कर्णधार मिचेल सॅण्टनर असे प्रतिभावान गोलंदाज असल्याने बांगलादेशच्या फलंदाजीचा कस लागणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंडकडे विल यंग, डेवोन कॉन्वे, केन विल्यम्सन, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स असे मॅचविनर फलंदाज आहेत. त्यामुळे तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन, रिशाद हुसैन या गोलंदाजांची खरी परीक्षा असेल.
बांगलादेशच्या विजयासाठी पाकिस्तानींची अल्लाकडे दुआ
अनंत अडचणींना दूर करत पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याकडे खेचून आणली. पाकिस्तानी क्रिकेटला पुनर्जीवन देण्यासाठी ते या स्पर्धेला संजीवनी मानत होती. मात्र त्यांचा पाकिस्तानी संघ पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत झाल्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता त्यांना नेट रनरेटच्या माध्यमातून उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची अंधुकशी आशा उरली आहे. त्यामुळे बांगलादेश-न्यूझीलंड सामन्याकडे अवघ्या पाकिस्तानींचे डोळे लागले आहेत. पाकिस्तानचे आव्हान जिवंत राहावे यासाठी उद्या बांगलादेशला जिंकणे महत्त्वाचे आहे आणि बांगलादेश जिंकावा म्हणून अवघा पाकिस्तान अल्लाकडे दुआ करणार आहे. जर अल्लाची मेहेरबानी झाली तरच पाकिस्तानचे आव्हान जिवंत राहील आणि ते बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी प्रयत्न करतील, मात्र जर उद्या न्यूझीलंड जिंकला तर यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे आव्हान आपोआप संपुष्टात येईल. त्याचबरोबर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ दोन विजयांमुळे उपांत्य फेरीत धडक मारतील.
उभय संघ
n बांगलादेश ः सौम्य सरकार, तंजीद हसन, नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), मुश्फिकुर रहीम, तौहीद हृदोय, जाकर अली (यष्टिरक्षक), महमुदुल्लाह, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान.
n न्यूझीलंड ः विल यंग, डेवोन कॉन्वे, केन विल्यमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिशेल सॅण्टनर (कर्णधार), नाथन स्मिथ, मॅट हेन्री, विलियम ओ’रुर्के.