Champions Trophy 2025 : कोण असणार टीम इंडियाचा कर्णधार? रोहित शर्मा की हार्दिक पंड्या, BCCI ने केले स्पष्ट

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन करत टी20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. चाहत्यांच्या गर्दीत विश्वविजेत्यांची जंगी मिरवणूक मुंबईत निघाली. या ऐतिहासीक विजयानंतर आता हिंदुस्थानी चाहत्यांच्या नजरा पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर लागल्या आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्याने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे त्याची कर्णधारपदी निवड होईल, अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार कोण असणार हे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पाकिस्तामध्ये करण्यात आले आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान बीसीसीआय सचिव जय शहा यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी रोहित शर्माच कर्णधार असल्याचे घोषित केले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुद्धा 2025 मध्ये पार पडणार आहे. या सामन्यासाठी सुद्धा रोहित शर्माच कर्णधार असल्याचे जय शहा यांनी सांगितले आहे. मात्र WTC च्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टीम इंडियाला न्युझीलंड, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध दमदार खेळ करावा लागणार आहे.