मालवणी खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा जोपासून सुरेखा व नितीन वाळके यांनी खवय्यांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी बनवलेल्या मालवणी पदार्थांची चव चाखण्यासाठी ‘चैतन्य’ या मराठमोळय़ा खाद्यगृहात खवय्यांची दररोज झुंबड उडतेय. आता अशीच झुंबड थेट चेन्नईत पाहायला मिळणार आहे. चेन्नईत ‘चैतन्य’च्या मालवणी पदार्थांचा खाद्य महोत्सव येत्या 25 ते 30 जूनदरम्यान ‘रेन ट्री’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. चेन्नईतील अस्सल खवय्यांना लज्जतदार मालवणी पदार्थांची खरी चव काय असते, हे अनुभवता येणार आहे. ‘द टेस्ट ऑफ मालवण’ या नावाने मालवणी खाद्य महोत्सवाद्वारे ‘चैतन्य’च्या प्रमुख सुरेखा वाळके, नितीन वाळके, सायली वाळके, मालवण चैतन्यचे शेफ प्रथमेश कुलकर्णी हे सर्व जण चेन्नईतील खवय्यांपुढे एकापेक्षा एक खास असे खाद्यपदार्थ सादर करणार आहेत.
‘या’ खाद्यपदार्थांची रेलचेल
मालवणी मसाल्यातील बटाटेवडे ते ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी ते माश्याचं तिखलं, आमटी, भाजलेले मासे, भरलेले पापलेट, कोळंबी भात, चिकन सागोती, वडे, भाकरी आणि मालवणी जेवणाची भैरवी सोलकढी अशी रेलचेल या खाद्य महोत्सवात पाहायला मिळणार आहे.