न्यूझीलंडचा सलामीवीर खेळाडू चाड बोवेस याने ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये महापराक्रम केला आहे. चाडने अवघ्या 103 चेंडूत द्विशतक ठोकत ‘लिस्ट ए’ मधील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम नावावर केला. या खेळी दरम्यान त्याने 27 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी केली.
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या पण सध्या न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या चाड बोवेस याने फोर्ड ट्रॉफी स्पर्धेत कॅटरबरीकडून खेळताना हा पराक्रम केला. ओटागोविरुद्धच्या लढतीत बोवेस याने 110 चेंडूत 205 धावांची खेळी केली. लिस्ट ए क्रिकेटमधील त्याची ही सर्वोच्च खेळी आहे. त्याने हिंदुस्थानच्या नारायण जगदीशन आणि ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडचा विक्रम मोडला. या दोघांनीही 114 चेंडूत द्विशतकाला गवसणी घातली होती.
ट्रेव्हिस हेड याने 2021-22 मध्ये मार्श कपमध्ये खेळताना दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 114 चेंडूत द्विशतक ठोकले होते. तर तामिळनाडूच्या नारायण जगदीशन याने 2022 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेश विरुद्ध खेळताना 227 धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने 200 धावांसाठी 114 चेंडू घेतले होते.
दरम्यान, 32 वर्षीय चाड बोवेस याने न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले आहे. गतवर्षीच त्याने न्यूझीलंडकडून पदार्पण केले होते. त्याने 6 वन डे आणि 11 टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. वन डे मध्ये त्याने 99, तर टी-20मध्ये 187 धावा केल्या आहेत. लिस्ट एमध्ये त्याच्या नावावर 100 सामन्यात 3492 धावांची नोंद आहे.