गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची चाचणी करणे झाले सोपे, ‘एम्स’च्या डॉक्टरांचे ब्लड टेस्टवर यशस्वी संशोधन

गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजेच सर्वायकल कॅन्सर हा उपचारांना प्रतिसाद देत आहे की नाही, हे एका ब्लड टेस्टच्या मदतीने आता समजणार आहे. याबाबतचे महत्त्वपूर्ण संशोधन दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) डॉक्टरांनी केले.

शास्त्रज्ञांना मानवी कॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) च्या डीएनएचे अंश आढळले. हा विषाणू गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी जबाबदार असतो. रक्तात फिरणाऱ्या या विषाणूची पातळी ट्यूमरच्या आकाराशी संबंधित होती. रुग्णावर उपचार सुरू केल्यावर ही पातळी कमी झाली. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी उपचारांना कसा प्रतिसाद देत आहेत हे दिसून आले. एम्सचा डॉक्टरांचे संशोधन नेचर ग्रुप जर्नल, सायंटिफिक रिपोर्टस्मध्ये प्रकाशित झाले आहेत.

रुग्ण कर्करोग उपचारांना प्रतिसाद देत आहे की नाही आणि नंतर ते कर्करोगमुक्त आहेत की नाही, हे तपासण्यासाठी वारंवार चाचण्या व स्पॅन करावे लागतात. त्याऐवजी ब्लड टेस्ट केल्याने हा खर्च कमी होऊ शकतो. ‘‘फक्त ज्यांचे बायोमार्कर वाढलेले आहेत, त्यांनाच संपूर्ण शरीराचे स्कॅन करावे लागते,’’ असे या अभ्यासाचे लेखक आणि एम्समधील मेडिकल ऑन्कोलॉजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मयंक सिंग यांनी सांगितले. ‘‘कधीकधी स्कॅनवर ट्यूमर दिसण्यापूर्वी रक्ताचे बायोमार्कर दिसू शकतात. त्यामुळे हे लवकर पुन्हा होण्याचे निदान करण्यासदेखील मदत करू शकते,’’ असे ते म्हणाले.

हा अभ्यास का महत्त्वाचा

एम्सच्या डॉक्टरांचा निष्कर्ष गेमचेंजर ठरू शकतो. कारण देशातील महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकाचा सामान्य कर्करोग आहे. 95 टक्क्यांहून अधिक प्रकरणे एचपीव्हीच्या काही उच्च-जोखीम प्रकारांच्या संसर्गाशी संबंधित आहेत. सामान्य तपासणी आणि फॉलोअप हे त्रासदायक व महागडे असल्याने रक्त चाचणी (ब्लड टेस्ट) हा एक स्वस्त पर्याय असू शकतो.