‘देशात असंख्य लोक आहेत. ते प्रामाणिक आहेत; पण फार ठरावीक लोक कुठेतरी गद्दार निघतात. आपल्याला त्याविरुद्ध लोकांसाठी लढायचं आहे,’ असा टोला आमदार रोहित पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा नामोल्लेख टाळून लगावला.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ येथील म्हतारबाचीवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन’ आंबेगाव तालुका पश्चिम विभाग आयोजित ‘शरदचंद्रजी करंडक-2024’ या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणप्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी बाजार समिती संचालक देवदत्त निकम, पुरुषोत्तम फदाले, दीपक चिमटे, अशोक पेकारी, डॉ. हरीश खामकर, शिवराम केंगले, सोमनाथ गेंगजे, लखन पारधी आदी उपस्थित होते. तालुक्यात रोहित पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पवार पुढे म्हणाले, ‘आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग मुंबईजवळ आहे. त्यामुळे आपल्या जमिनी आपल्या ताब्यात ठेवा. बाहेरील लोकांना विकू नका. येथे पुढील काळात मोठय़ा प्रमाणात पर्यटन होईल. शरद पवार यांनी दूरदृष्टी ठेवून डिंभे धरण बांधले आहे. तीच दूरदृष्टी ठेवून आदिवासी बांधवांनी आपल्या जमिनी विकू नयेत.’