केंद्र सरकारकडून जनगणना कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जातीच्या नोंदणी संदर्भात एक कॉलम जोडण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी रविवारी दिली. मात्र त्याचवेळी त्यावर अंतिम निर्णय घेणं बाकी असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका सूत्रानं सांगितले की, केंद्र सरकारकडून लवकरच जनगणना केली जाईल. 1881 पासून हिंदुस्थानने दर 10 वर्षांनी जनगणना केली आहे. या दशकातील जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल 2020 रोजी सुरू होणे अपेक्षित होते परंतु कोविड-19 साथरोगामुळे ती पुढे ढकलली गेली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीनिहाय जनगणनेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर केंद्र सरकार त्याचा स्वीकार करण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा होती.