मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती झाली आहे. येत्या काही दिवसांत ते मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजिअमने 7 जानेवारी रोजी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून, तर आराधे यांची मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. त्याला राष्ट्रपतींनी मंगळवारी मंजुरी दिली. न्यायमूर्ती आराधे यांची 2009 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 2011 साली ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाले. त्यानंतर जम्मू-कश्मीर, कर्नाटक हायकोर्टात प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. जुलै 2023 मध्ये ते तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती बनले.