मध्य रेल्वे मार्गावर जानेवारी ते ऑक्टोबर या गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2 हजार 388 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या आकडेवारीत 14 टक्क्यांची घट झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत मध्य रेल्वेमार्गावर मृत्यूची 2 हजार 755 प्रकरणे उघडकीस आली होती. मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर अशा मध्य रेल्वेच्या पाच विभागातील ही आकडेवारी आहे.
रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक आहे अशी सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते तरीही लोक धोकादायकरित्या रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. रेल्वे रुळाजवळ असलेल्या लोकवस्तीमधील लोकदेखील विविध कामानिमित्त रुळावरूनच ये-जा करत असतात. रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ‘मिशन झिरो डेथ’ अंतर्गत व्यापक जनजागृती मोहिम राबवली तरी असे अपघात रोखणे रेल्वे प्रशासनासमोर आव्हान आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत रेल्वेमार्गावर 1352 जण जखमी झाले होते. यंदा दहा महिन्यांमध्ये 1211 जण जायबंदी झाले आहेत. धावत्या रेल्के गाडीतून पडल्यामुळे गेल्या दहा महिन्यांमध्ये 653 जण मृत्युमुखी किंवा जखमी झाले आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे गाडी यांच्यामध्ये कोसळून 91 जण जखमी किंवा मृत्युमुखी पडले आहेत. तसेच आत्महत्या, विजेच्या धक्कयाने मृत्यू, हृदयकिकाराचा धकका, आजार यासारख्या कारणांमुळे मृत्यूची 1423 प्रकरणे निदर्शनास आली आहेत.
205 ब्लॅक स्पॉट
रेल्वे रुळ ओलांडून जिथे सर्वाधिक मृत्यू होतात असे 205 ब्लॅक स्पॉट मध्य रेल्वेने निश्चित केले आहेत. अशा ठिकाणी संरक्षक भिंत, जाळी उभारणे अशा उपाययोजना केल्या आहेत.