![Mega Block](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Mega-Block-696x447.jpg)
ओव्हरहेड वायर व रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा रविवारी प्रवासात खोळंबा झाला. सकाळी घराबाहेर पडलेले प्रवासी दुपारपर्यंत प्रवासातच लटकले. मेन लाइनसह हार्बरच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. सायंकाळीही लोकल 20 ते 30 तास मिनिटे उशिराने धावल्या.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी मागील आठवडाभर विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप सहन केला. त्यात रविवारच्या मेगाब्लॉकची भर पडली. मध्य रेल्वे प्रशासनाने माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेऊन दुरुस्ती कामे केली. ब्लॉकने लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. रविवारी लग्न, साखरपुडय़ाचा शुभमुहूर्त होता. त्या समारंभांसाठी कुटुंबीयांसोबत घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पश्चिम रेल्वेलाही लेटमार्क
पश्चिम रेल्वेने ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ब्रिज क्र. 5 चे जुने स्टील गर्डर बदलण्यासाठी शनिवारी विशेष ब्लॉक घेतला होता. या कामासाठी 13 तासांचा वेळ अपेक्षित होता. ते काम दहा तासांत पूर्ण करण्यात रेल्वेच्या अभियंत्यांनी यश मिळवले. मात्र या ब्लॉकमुळे रविवारी सकाळी चर्चगेट ते विरार मार्गावरील लोकल उशिराने धावल्या.