एसी लोकलमध्ये फुकटय़ांची वाढती घुसखोरी, मध्य रेल्वेने वर्षभरात 81 हजार जणांना पकडले; पावणेतीन कोटींचा दंड वसूल

उपनगरी लोकलचा प्रवास सुखकर करण्यासाठी एसी लोकल सुरू करण्यात आल्या. मात्र या लोकलमध्येही फुकटय़ा प्रवाशांचा शिरकाव वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. मध्य रेल्वेने एसी लोकलमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत वर्षभरात 81 हजार 709 फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 2 कोटी 70 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वेवर धावणाऱ्या नियमित लोकलपेक्षा एसी लोकलमध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्या अधिक वाढली आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2024-2025 या आर्थिक वर्षात एसी लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तब्बल 143.09 टक्क्यांनी वाढली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी एसी लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्या 81 हजार 709 प्रवाशांना पकडले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना 2.70 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 2023-2024 च्या आर्थिक वर्षात 35 हजार 885 फुकटय़ा प्रवाशांना पकडून 1 कोटी 19 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. जानेवारी 2025 मध्ये 8 हजार 535 फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई केली, तर 27.82 लाख रुपये दंड वसूल केला.  जानेवारी 2024 मध्ये 3 हजार 511 प्रवाशांवर कारवाई करताना 11.83 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला होता.

मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकल मार्गावर रोज 1 हजार 810 सेवांद्वारे सुमारे 39 लाख प्रवासी ये-जा करतात. यामध्ये 66 एसी लोकलमधून दररोज अंदाजे 76 हजार 836 जण प्रवास करतात. एसी लोकलचे तिकीट न काढताच ‘पूल’ प्रवासाचा लाभ उठवणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली.