मध्य रेल्वेवर 63 तासांचा जम्बोब्लॉक… रविवारपर्यंत चाकरमान्यांचे हाल

मध्य रेल्वे मार्गावर उद्यापासून रविवारपर्यंत 63 तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान तब्बल 930 लोकल फेऱया, 72 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे उपनगरातून कामाधंद्यानिमित्त मुंबईत येणाऱया लाखो चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. दरम्यान, रेल्वेने वर्क फ्रॉम होमचा सल्ला नोकरदारांना दिला आहे. त्याच वेळी आवश्यकता असेल तरच रेल्वेने प्रवास करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट 10/11 ची लांबी वाढविण्यासाठी व ठाणे येथील फलाट 5/6 ची रुंदी वाढविण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे येथे 63 तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवारी मध्यरात्री ब्लॉकला सुरुवात झाली असून रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारी 12.30 वाजेपर्यंत असा 36 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि फायद्यासाठी हे ब्लॉक्स आवश्यक आहेत. त्यामुळे होणाऱया गैरसोयींबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रवाशांना केले आहे.

930 लोकल फेऱया, 72 मेल-एक्स्प्रेस रद्द
मध्य रेल्वे मार्गावर दररोज 1810 लोकल फेऱया चालवल्या जातात. ब्लॉकच्या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावरील 930 लोकल फेऱया रद्द होणार असून याचा फटका सुमारे 33 लाख प्रवाशांना बसणार आहे. शुक्रवारी 161, शनिवारी 534 तर रविवारी 235 लोकल फेऱया रद्द केल्या जातील, तर ब्लॉक कालावधीत शुक्रवारी 4, शनिवारी 37 आणि रविवारी 31 अशा 72 मेल-एक्स्प्रेस गाडय़ा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

प्रवाशांच्या मदतीला बेस्ट, एसटी धावणार
ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी आणि बेस्ट प्रशासन मदतीला धावणार आहे. बेस्ट उपक्रमातर्फे 55 अतिरिक्त बस सोडण्यात येणार असून एकूण 486 फेऱया चालविण्यात येतील. सीएसएमटी ते दादर स्थानक पूर्व, कुलाबा आगार ते भायखळा स्थानक पश्चिम, कुलाबा आगार ते वडाळा स्थानक पश्चिम, कुलाबा आगार ते वडाळा आगार, सीएसएमटी ते धारावी आगार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते प्रतीक्षानगर आदी मार्गांवर या अतिरिक्त बस चालविण्यात येतील. एसटी महामंडळाने मुंबईतील कुर्ला-नेहरूनगर, परळ आणि दादर आगारातून ठाण्यासाठी 50 जादा गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.