
विठ्ठलवाडी तसेच उल्हासनगर रेल्वे स्थानकाशेजारील 162 घरांवर मंगळवारी बुलडोझर फिरवण्यात आला. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बाधितांना पनवेलमध्ये पर्यायी घरे दिली असून मध्य रेल्वेच्या कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे काम आता फास्ट ट्रॅकवर होणार आहे. हा नवा मार्ग सुरू झाल्यानंतर लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेमार्फत तिसऱ्या व चौथ्या माार्गिकेचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना अनेक अडथळे येत असून ते दूर केले जात आहेत. कल्याण ते बदलापूर लोहमार्गावरदेखील असेच काम रेल्वेने हाती घेतले. परंतु विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाशेजारी 32 व उल्हासनगर स्थानकाजवळील घरे बाधित झाली होती. ज्यांची 100 टक्के घरे जाणार होती अशांना बाजारभावाप्रमाणे रेल्वेने मोबदला दिला आहे. मात्र उर्वरित 162 जणांचे पनवेलमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेचे काम आता जलदगतीने होणार आहे.
पोलीस बंदोबस्तात कारवाई
रेल्वे प्रशासन आणि पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे आदींनी पोलीस बंदोबस्तात जेसीबी व बुलडोझरच्या सहाय्याने मार्गात अडसर ठरणारी घरे जमीनदोस्त केली.
■ सहा महिन्यांपूर्वीच या घरांचे सर्वेक्षण रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आले. सदनिकाधारकांना नोटिसा बजावत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
■ विठ्ठलवाडी मधील 32 सदनिकाधारकांना पनवेल येथे घरे देण्यात आली आहेत. उल्हासनगरमधील बाधितांनाही घरे मिळणार आहेत, असे असले तरी काही कुटुंबे विरोधाच्या भूमिकेत होती.