परळ ते कल्याण सातव्या-आठव्या लाईन्सचा सर्व्हे सुरू, लोकलच्या मार्गातील एक्प्रेसचा अडथळा दूर होणार

मध्य रेल्वे मार्गावर लोकलच्या वाहतुकीत लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा येणारा अडसर नजीकच्या काळात दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने परळ ते कल्याण स्थानकांदरम्यान सातव्या आणि आठव्या मार्गिकांचे बांधकाम करण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण (फिल्ड सर्व्हे) सुरू केले आहे. हे सर्वेक्षण उपनगरी रेल्वेचा विस्तार आणि परळच्या मेगा टर्मिनस प्रकल्पाचा भाग असल्याची माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.

मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने परळ आणि कल्याण स्थानकांदरम्यान 45 किमी अंतराच्या कॉरिडॉरसाठी क्षेत्र सर्वेक्षण सुरू केले आहे. हे सर्वेक्षण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन सातव्या आणि आठव्या मार्गिकांचे काम दीर्घकालीन नियोजनाचा भाग आहे. कल्याण आणि परळ मेगा टर्मिनसदरम्यान लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे प्रमाण वाढवण्याच्या हेतूने स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून दिले जातील. लोकल वाहतुकीत अडथळा न आणता लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी चार स्वतंत्र मार्ग उपलब्ध असतील, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले. कल्याणच्या पुढे तिसऱया आणि चौथ्या मार्गिकांचा विस्तार करण्याचे काम आधीच सुरू झालेले आहे. घाट विभागातही अतिरिक्त मार्गिका टाकल्या जात आहेत.

पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे आव्हान

सध्या मध्य रेल्वेपुढे कुर्ला व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे. हा 34 किमीचा पट्टा दोन भागांत विभागलेला आहे. यात पहिला 10.1 किमीचा कुर्ला ते परळ विभाग आहे, तर दुसरा भाग परळ ते सीएसएमटीपर्यंत आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार कुर्ला ते परळदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे काम केले जात आहे.