![mumbai local train](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/06/mumbai-local-train-696x447.jpg)
उपनगरी लोकलची सेवा गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर भिवपुरी- कर्जत स्थानकांदरम्यान सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी, प्रवाशांचा ऐन ‘पीक अवर्स’ला खोळंबा झाला. मंगळवारी पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडाचे विघ्न निर्माण झाले होते. बुधवारी मुंब्रा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. परिणामी, लोकल गाडय़ा सकाळच्या ‘पीक अवर्स’ला 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यापाठोपाठ गुरुवारी सलग तिसऱया दिवशी लोकल सेवेची रखडपट्टी झाली. याला निमित्त होते ते भिवपुरी-कर्जत स्थानकांदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडाचे. या बिघाडामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाडय़ा सकाळी जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिराने धावल्या. त्यामुळे कामावर चाललेल्या नोकरदारांची प्रचंड गैरसोय झाली.