ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळल्याने मध्य रेल्वे खोळंबली; लेटमार्क टाळण्यासाठी चाकरमान्यांची ट्रॅकवरून पायपीट

ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळल्याने मध्य रेल्वे तब्बल अर्धा तास खोळंबल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. माटुंगा स्थानकानजीक घडलेल्या या घटनेमुळे सकाळी कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. लेटमार्क टाळण्यासाठी चाकरमान्यांनी अक्षरशः ट्रकवरून पायपीट केली.

माटुंगा स्थानकाच्या बाजूला काही बांधकाम सुरू आहे. त्याच ठिकाणचे काही बांबू ओव्हरहेड वायरवर पडले. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱया जलद लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. जवळपास अर्धा तास खोळंबलेली वाहतूक सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पूर्ववत झाली. ऑफिस वेळेत गाठण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरू असताना ही घटना घडल्याने चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.