
मध्य रेल्वेने रविवारी देखभाल व दुरुस्ती कामासाठी मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेतला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सायंकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत दुरुस्तीकाम केले जाणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 09.34 ते दुपारी 03.03पर्यंत सुटणाऱया डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल ठाणे व कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत सुटणाऱया अप जलद/अर्ध-जलद लोकल कल्याण व ठाणेदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादरवरून सुटणाऱया डाऊन मेल/एक्सप्रेस ठाणे व कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादर येथे येणाऱया अप मेल/एक्सप्रेस कल्याण व ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरून वळवल्या जाणार आहेत.